श्री शिवसमाधीचे एक दुर्मिळ छायाचित्र...
"तुम्ही चुकूर होऊ नका! हा तो मृत्यूलोक, या मागे किती उत्पन्न झाले तितुके गेले..." कृष्णाजी सभासदा ने आपल्या शिवचरित्रात शिवरायांचे हे शेवटचे उद्गार नोंदवून ठेवले आहेत. रायगडावर १६८० च्या एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या तारखेला तिथी नुसार हनुमान जयंती दिवसी दोन प्रहरी महाराजांनी आपला देह ठेवला. शिवसूर्य भर मध्यांनी अस्ताला गेला. महाराजांच्या देहाला जगदिश्वर मंदिरा समोर अग्नी दिला गेला. तिथेच महाराजांची समाधीही बांधली गेली. आज तिनशे चाळीस वर्षे झाली या घटनेला! पण मराठ माणसाचे मन या घटनेच्या आठवणीने आज ही कासावीस होते.
श्री शिवछत्रपतींच्या पाऊलखुणा शोधत आसताना आम्हाला शिवसमाधीचे हे छायाचित्र मनोरंजन च्या जुन्या अंकात मिळाले. हा अंक कोल्हापूरचे बाळासाहेब सरनाईक यांनी उपलब्ध करुन दिला होता. शिवसमाधी जिर्णोध्दारा आगोदरचे सगळ्यात स्पष्ट छायाचित्र हेच आहे. ते आम्ही 'शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध' आणि "राजर्षी शाहू छत्रपती रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र" या दोन्ही पुस्तकात छापले आहे. शिवरायांच्या रायगडावरील समाधीचा सर्वात जुना कागदोपत्री उल्लेख १० मे १८१८ रोजी कर्नल प्राॕथर ( यानेच रायगड पेशव्यांकडून जिंकून घेतला.) याने रायगडावरुनच लिहलेल्या पत्रात मिळतो. या टोपीकराने रायगडाचा नकाशाही त्यावेळी करुन ठेवला होता. लवकरच हा नकाशाही उपलब्ध होईल.
इंद्रजित सावंत ,
३/४/२०२१.
कोल्हापूर.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा